लॉकडाउनमुळे हापूसची परदेश वारी थांबली आहे. आता वाशी मार्केटमध्ये उठाव नाही, त्यामुळे हापूस आंबा बागायदारांची दुहेरी कोंडी झाली आहे.
दापोली (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाउन संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाउनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढवण्यात आहे. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
लॉकडाउनमुळे हापूसची परदेश वारी थांबली आहे. आता वाशी मार्केटमध्ये उठाव नाही, त्यामुळे हापूस आंबा बागायदारांची दुहेरी कोंडी झाली आहे.
कोकणातील हापूस आंबा बागायतदार शेतकऱ्यांना लॉकडाउन मधून वगळून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. परंतु, लॉकडाउनमुळे झाडावरील आंबे काढण्यासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. तसंच आंबा बागांची राखनदारी करणारे मजूर सुद्धा आपल्या गावी निघून गेल्यामुळे आंबा बागेत काम करण्यासाठी माणसेच नाहीत. त्यामुळे बागायतदार हवालदील झाले आहेत.
अत्यावश्यक सेवांमध्ये हापूस आंब्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे वाटत होते. परंतु, लॉकडाउन परिस्थितीत वाशी मार्केटमध्ये आंबा खरेदीसाठी ग्राहकच उपलब्ध नाही. त्यामुळे हापूस आंबा पेटीला उठावच नाही. तसंच वाशी मार्केटमध्ये लाखो पेटी माल पडून असल्याने हा आंबा विकायचा कुठे हा प्रश्न निर्माण झाला आहे.
14 एप्रिलनंतर लॉकडाउन शिथिल झाल्यास वाशी मार्केट आणि स्थानिक बाजारपेठेत आंबा जाईल, अशी आशा आंबा बागायतदार बाळगून होते. परंतु, लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आल्याने आंबा बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.