नर्सची सेवा बजावणाऱ्या मातेला कोरोनामुळे एकवीस दिवस आपल्या तीन वर्षांच्या मुलीला भेटता आले नव्हते. पण आज माय लेकीचा एकवीस दिवसाचा विरह संपला आणि त्यांची भेट झाली.
बेळगाव : कोरोनामुळे ताटातूट झालेल्या मायलेकीची तब्बल एकवीस दिवसांनी भेट झाली. इतक्या दिवसांच्या विरहानंतर भेट झाल्यानंतर मुलीच्या भावनांचा बांध सुटला. यावेळी आईलाही अश्रू अनावर झाले. नर्सची सेवा बजावणाऱ्या मातेला कोरोनामुळे एकवीस दिवस आपल्या तीन वर्षांच्या मुलीला भेटता आले नव्हते. पण आज तो योग घडून आला, माय लेकीचा एकवीस दिवसानंतर एकमेकांना भेटता आले. एकवीस दिवस एकमेकांना भेटू न शकणाऱ्या आईची आणि तीन वर्षांच्या मुलीची आज भेट झाली. ते दृश्य पाहून पाहणाऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
जिल्हा रुग्णालयात नर्स म्हणून सेवा बजावणाऱ्या सुगंधा कोरीकोप्प यांची कोरोना रुग्णाच्या वार्डमध्ये नियुक्ती झाल्याने एकवीस दिवस त्यांना स्वतःच्या मुलीलाही भेटता आले नव्हते. जिल्हा रुग्णालयात जवळ असणाऱ्या लॉजमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी मुलगी ऐश्वर्या आईची आठवण खूप काढायला लागल्यावर नर्सना ठेवण्यात आलेल्या लॉजकडे मुलगी ऐश्वर्या हिला सुगंधाचे पती घेऊन आले होते. त्यावेळी दुरुनच सुगंधा यांनी मुलीला पाहिले. आईला पाहिल्यावर मुलगी आई मला तुझ्याकडे घे म्हणून रडायला लागली पण आईही मुलीला जवळ घेऊ शकत नव्हती. मन घट्ट करून मुलीला दुरूनच तिने बघून टाटा करून लॉजमध्ये निघून गेली होती. शनिवारी ड्युटी संपवून सुगंधा आपल्या घरी आल्या त्यावेळी आई येत असल्याचे कळताच ऐश्वर्या धावतच आईला भेटायला गेली. आईजवळ जाताच आईच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले. मुलीनेही आईला घट्ट मिठी मारली. नंतर आई देखील रडायला लागली. ही हृदयस्पर्शी भेट पाहून गल्लीतील लोकांच्या डोळ्यातही अश्रू तरळले.