विनय दुबेने चलो घर की ओर मोहीम सुरु केली होती. मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्याने दिला होता.
मुंबई (प्रतिनिधी): मुंबईतील वांद्रे स्टेशनवर स्थलांतरित मजुरांच्या गर्दीप्रकरणी पोलिसांनी विनय दुबे नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी (15 एप्रिल) रात्री विनय दुबेला ऐरोलीतून ताब्यात घेतलं आणि मुंबई पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. त्यानंतर त्याला रात्री उशिरा वांद्रे पोलिसांत हजर करण्यात आलं, तिथे त्याला अटक करण्यात आली. आज त्याला कोर्टात हजर करुन पुढील कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान मजुरांची दिशाभूल करुन गर्दी जमवल्याचा आरोप विनय दुबेवर आहे.
विनय दुबे हा उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष आहे. विनय दुबेचा मुंबईत मजुरी करणाऱ्या उत्तर भारतीय आणि पश्चिम बंगालच्या मजुरांशी दांडगा जनसंपर्क आहे.
विनय दुबेने 'चलो घर की ओर' मोहीम सुरु केली होती. त्याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये हे आवाहन केलं होतं. यासंदर्भात त्याने ट्वीटही केलं होतं. स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावी जाण्यासाठी 18 एप्रिलपर्यंत ट्रेनची सोय केली नाही तर देशव्यापी आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्याने दिला होता.
20 एप्रिलला पदयात्रेला सुरुवात करु : विनय
विनय दुबेने शनिवारी एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केला होता. व्हिडीओत विनय दुबे परप्रांतीयांना सोबत घेऊन आपण उत्तर प्रदेशपर्यंत पदयात्रा काढणार असल्याचं सांगत आहे. मजुरांना आपापल्या गावाला पाठवण्याची सोय केली नाही आणि हे प्रकरण 14 ते 15 तारखेपर्यंत मिटलं नाही तर 20 एप्रिलला पदयात्रेला सुरुवात करु, अशी धमकी त्याने व्हिडीओत दिली होती. यावेळी त्याने आपल्याला पाठिंबा असणाऱ्यांना व्हॉट्सअॅपला मेजेस टाकावा असं आवाहन केलं होतं.