अमित शाहांनी उद्धव ठाकरेंप्रमाणे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन केला का... : बाळासाहेब थोरात

वांद्रे येथील घटनेनंतर ट्विटरवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असा हॅशटॅग सुर झाला होता, तो कसा झाला माहित नाही. अशा घटनांमधून राजकारण होतंय का असा संशय बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.



मुंबई (प्रतिनिधी) : वांद्रे येथील गर्दीच्या घटनेनंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वांद्रे येथे जे झालं त्यानंतर ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हॅशटॅग सुरु झाला. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन पदाचा राजीनामा द्यावा, राज्यात राष्ट्रपती शासन लागू करा, अशा मागण्या ट्विटरवर सुरु झाल्या होत्या. ट्विटरवर असे हॅशटॅग कसे सुरु होतात हा देखील प्रश्न आहे, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.


लोकांना रस्त्यावर एकत्र येऊन गर्दी केल्याची घटना केवळ वांद्रे येथेच घडलेली नाही. याआधी सूरतमध्ये अशी घटना दोनदा घडली आहे. हैदराबादमध्ये घडली, केरळमध्ये घडली आहे, आणखी काही ठिकाणी अशा घटना अशा घटना घडल्या आहेत. वांद्रे येथील घटना घडल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. मात्र इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही फोन केला होता का? किंवा त्या राज्यांमध्ये ट्विटरवर असे हॅशटॅग फिरु लागले होते का? हे मला माहित नाही, मात्र याचं कारण काय? या घटनांमध्ये राजकारण तर होत नाही ना. सध्याच्या परिस्थितीचं राजकारण करु नये असा मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे. त्यामुळे असं राजकारण करणे चुकीचं आहे, असं थोरात यांनी म्हटलं. तर काही लोक या घटनांना धार्मिक स्वरुप देत आहेत, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.


वांद्रे येथे जे लोक जमले होते, त्यांची गैरसोय होते, त्यांना अन्नधान्य मिळत नाही, असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही. गेल्या महिनाभरापासून ते मुंबईत अडकले आहेत. त्यांच्या हातात काम नाही, घरात ते कोंडून आहेत. त्यांची घरंही छोटी छोटी आहेत. या सर्वांमुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. त्यामुळे आम्हाला आमच्या गावी परत जाऊद्या अशी त्यांची मागणी होती, असं बाळासाहेब थोरातांनी सांगितलं.