परराज्यातील मजुर लॉकडाऊनमुळे अडकले होते. त्यांना जिथं क्वारंटाइन करण्यात आलं होतं तिथं मिळणाऱ्या सुविधांबद्दल आभार मानण्यासाठी त्यांनी शाळेला रंग दिला.
मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाचा सामना करता अनेकांना चांगले-वाईट अनुभव आले आहेत. अचानक लॉकडाऊन जारी केल्यानंतर परराज्यातील मजुरांसमोर आ वासून हे संकट उभं आहे. काही जणांनी पायी जात घरचा रस्ता गाठला असला तरी आजही अनेकजण मिळेल त्या परिस्थितीत राहत आहेत.
राजस्थानातील सिकर गावात थांबलेल्या मजुरांनी एक चांगला पायंडा पाडून दिला आहे. राजस्थानच्या सिकर गावात हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील 54 मजुर काम करतात. या सर्वांची सोय त्याच गावातील दोन शाळांमध्ये करुन दिली आहे. या मजुरांसाठी स्थानिक मोफत जेवण पुरवित आहेत. कोरोनामुळे सर्वांनांच भविष्याची चिंता आहे. मात्र अशा अवघड परिस्थितीतही गे गावकरी मजुरांच्या मदतीला धावून आले आहेत. अशावेळी आपणही काहीतरी करावं या इच्छेने मजुरांनी शाळा रंगवून देण्याचं काम घेतलं. यासाठी त्यांनी सरपंचाना रंग आणि इतर साहित्य देण्याची मागणी केली. आता येथील कामगार शाळा रंगवत आहेत.
सिकर गावातील या शाळांना गेल्या 9 वर्षांपासून रंगकाम केलं नव्हतं. स्थानिक शिक्षकांनी पैसे जमा करुन हे काम करायचं ठरवलं होतं. मात्र मजुरांनी हे काम स्वत: पूर्ण करायची तयारी दाखवली. या कामाचे पैसे घेण्यास मजुरांनी नकार दर्शवला आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले. ही परतफेड नाही तर हा समोरच्या व्यक्तीला त्याच्या चांगूलपणासाठी दिलेला मदतीचा हात आहे, असं म्हणायला काही हरकत नाही.