देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहायला मिळत आहे. संपूर्ण विश्वात अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. अशातच रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.
मुंबई (प्रतिनिधी) : आरबीआयकडून रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली असून 25 बेसिस पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता हा रिव्हर्स रेपो रेट 4 वरून 3.75 टक्क्यांवर आला आहे. यासोबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. यावेळी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, संपूर्ण जगावर मंदीचं सावट आहे. कोरोनामुळे जगभरातील बाजार कोसळले आहेत. संपूर्ण विश्वात अर्थव्यवस्था वाईट स्थितीत आहे. मंदीच्या संकटाशी लढण्याचा आरबीआयचा प्रयत्न सुरु आहे, असं शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. सध्या मानवतेसमोर कोरोना व्हायरसचं संकट आहे. या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत, असं दास यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
यावेळी शक्तिकांत दास म्हणाले, जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी 1.9 टक्के विकास दर राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर 7.2 टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो.
अशी असेल मदत
मायक्रो बँकिंग क्षेत्रासाठी एकूण 50 हजार कोटींची मदत घोषित केली आहे. यातील 15 हजार कोटी रुपये भारतीय लघू उद्योग विकास बॅंकेला देण्यात येत आहेत. कर्जाच्या पुर्नगठनासाठी हे पैसे देण्यात येत आहेत. 10 हजार कोटी एनएचबी आणि 25 हजार कोटी रुपये नाबार्डला देण्यात येणार आहेत.