प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार

कोरोना व्हायरस विरूद्ध लढा देणाऱ्या 'कोरोना वॉरियर्स'चे आभार मानण्यासाठी जगभरातील कलाकारांनी 'वन वर्ल्ड : टुगेदर एट होम' या इव्हेंटमध्ये सहभाग घेतला होता.



नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच जीवघेण्या आजाराविरूद्धच्या लढ्यात जगभरातील अनेक सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. या महामारीमध्ये प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता, लोकांची मदत करणाऱ्या लोकांचे बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा-जोनास, शाहरूख खान यांच्यासह लेडी गागा आणि जगभरातील इतर सेलिब्रिटींनी आपल्या खास अंदाजात आभार मानले आहेत. लेडी गागाच्या 'वन वर्ल्ड : टुगेदर एट होम' या इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटी जोडले गेले. या कॉन्सर्टमध्ये जगभरातील 70 हून अधिक कलाकार आणि सेलिब्रिटी सहभागी झाले.


'वन वर्ल्ड : टुगेदर एट होम' या वर्चुअल कॉन्सर्टचं आयोजन डब्ल्यूएचओ आणि ग्लोबल सिटिझन यांनी एकत्र येत शनिवारी केलं होतं. याचं होस्टिंग जिमी फेलोन, जिमी किमेल आणि स्टीफन कोलबर्ट यांनी केलं होतं. या कार्यक्रमामध्ये टेलर स्विफ्ट, एल्टन जॉन, सेलिन डायोन, जेनिफर लोपेज, मडोना, द रोलिंग स्टोन्स, स्टीव वंडर आणि पॉल मेकार्टनी हेदेखील सहभागी झाले होते.


अभिनेत्री प्रियांका चोप्राने आपल्या इन्स्टाग्रामवर या वर्च्युअल कॉन्सर्टचे काही क्षण शेअर केले आहेत. यादरम्यान प्रियांका चोप्रा-जोनसने या व्हिडीओमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील गंभीर परिस्थितीबाबत बोलताना दिसली.


प्रियांका चोप्रा बोलताना म्हणाली की, 'या गोष्टीबाबत कोणतीच शंका नाही की, कोविड-19 ने संपूर्ण जग आपल्या विळख्यात अडकवलं आहे. याचा प्रभाव अत्यंत भयानक आहे. कोरोनामुळे जगभरात जो हाहा:कार माजला आहे, तो फारच भयंकर आहे. परंतु, या संटकटाच्या काळात आपण सर्वांनी एकत्र असणं आवश्यक आहे.'


तर शाहरूख खानही या वर्च्युअल कॉन्सर्टमध्ये सहभागी झाला होता. शाहरूख खानने भारतामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोपाबाबत सांगितलं. शाहरूख खानने याबाबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. 'भारत आपल्या इतिहासातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या संकटाचा सामना करत आहे. अब्जावधींची लोकसंख्या असल्यामुळे कोविड-19 चा प्रभाव देशावर नकारात्मक पद्धतीने होत आहे. अशाचप्रकारच्या संकटाचा सामना अख्यं जग करत आहे.'


किंग खान पुढे बोलताना म्हणाला की, 'आता मी रूग्ण, हॉस्पिटल आणि घरांना सुरक्षात्मक उपकरण, क्वॉरंटाईन केंद्रामध्ये जेवण आणि आवश्यक गोष्टी पुरवण्यासाठी काम करणाऱ्या एका टीमसोबत काम करत आहे. परंतु, जगभरात या महामारीला हरवण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र येण्याची गरज आहे.'