आज पुण्यात दिवसभरात 44 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे (प्रतिनिधी): मुंबई - पुण्यातील वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या चिंता वाढवणारी आहे. आतापर्यंत मुंबईत 111 जणांचा मृत्यू झाला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मेपर्यंत लॉकडाऊनची मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. त्यातच आज पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी नागरिकांना कळकळीचं आवाहन केलं आहे.
आज पुण्यात दिवसभरात 44 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 157 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका कोरोनाबाधितावरील उपचार पूर्ण झाले असून तो बरा झाल्याने त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. 6 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पाच ससूनमध्ये तर एक खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल आहे. कोरोनाबाधीत चौघांचा मृत्यू, त्यामध्ये तीन महिला, एका तरुणाचा समावेश आहे. पुण्यात कोरोनामुळे आजपर्यंत एकूण 37 जणांचा मृत्यू झाला असून पुणे शहरातील 34, बारामतीत 1 आणि नगर आणि ठाणे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
सध्या अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये फ्लूची (Flu) लक्षणे आढळून येत आहे. मात्र नागरिक त्यावर घरगुती उपचार करीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अशा प्रकारे स्वयं उपचार करणे धोक्याचे आहे. या घरगुती उपचारांमुळे काही काळासाठी बरं वाटतं मात्र पुन्हा त्रास सुरू होते आणि त्यानंतर नागरिक रुग्णालयात भर्ती होत असल्याचं दिसून येत आहे. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने अनेकजण दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यातील कोरोनाबाधित व मृत्यूंच्या संख्येवर नियंत्रण आणायचे असल्यास वेळीत उपचार करणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढला तर पुढे जाऊन अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे सर्व पुणेकरांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी असं करू नये आणि वेळीत उपचार घ्यावा. घरगुती उपचार करू नये, असं आवाहन पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी सांगितलं आहे.