ससूनचे अधिष्ठाता डाॅ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर निवासी डॉक्टरांचा सामूहिक राजीनाम्याचा इशारा

  • पुण्यातील ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला ससूनच्या रेसिडेंट डाॅक्टरांनी विरोध केला आहे.

  • ससूनमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.



पुणे (प्रतिनिधी): पुण्यातले ससून हाॅस्पिटलचे अधिष्ठाता डाॅ. चॅदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीला ससूनच्या रेसिडेंट डाॅक्टरांनी विरोध केला आहे. डाॅ. चंदनवाले यांची बदली ही अन्यायकारक आहे असं त्यांचं म्हणणं आहे. निवासी डाॅक्टर आणि इतर कर्मचारी यांची मिटींग घेऊन त्यामध्ये पुढची भूमिका ठरवली जाईल असं मार्ड (ससून) तर्फे सांगण्यात आलं आहे. दरम्यान, ससून हाॅस्पिटलमधील नर्सेस, फॅकल्टी, निवासी डाॅक्टर, क्लास 3, क्लास 4 कर्मचारी, सफाई कर्मचारी हे हाॅस्पिटलच्या आवारात असलेल्या बीजे मेडिकल काॅलेजच्या इमारतीसमोर जमा झाले होते.  दरम्यान ससूनमधे अचानक आंदोलन सुरू करण्यात आल्यामुळे पोलिसांना बोलवावं लागलं. त्यानंतर आंदोलन करणारे डॉक्टर आणि कर्मचारी पांगले.


डॉक्टर अजय चंदनवाले हे दहा वर्षांहून अधिक काळ ससुन रुग्णालयात ठाण मांडून आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची मुंबईला बदली करण्यात आली होती. पण चारच महिन्यांत ते पुण्यातील ससूनचे अधिष्ठाता म्हणून परत रुजू झाले. ससूनमधे कोरोना रुग्णांचे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आरोप ससूनच्या व्यवस्थापनावर आरोप होऊ लागले होते.  प्रशासकीय अधिकाऱ्यांची  चंदनवाले यांच्याबद्दल नाराजी वाढत गेली. काल जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात कारवाईचे संकेत दिले होते आणि संध्याकाळीच चंदनवाले यांची  बदली झाली. पण या बदलीला विरोध करत निवासी डॉक्टरांनी सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिलाय. आता विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी या निवासी डॉक्टरांना चर्चेसाठी बोलावलं आहे.



दरम्यान, डॉ. चंदनवाले यांच्याकडे मुंबईतील वैद्यकीय शिक्षण सहसंचालक, आरोग्य या पदाचाही कार्यभार आहे. त्या पदावर रुजू होण्याचे आदेश गुरुवारी डॉ. चंदनवाले यांना देण्यात आले आहेत. डॉ. चंदनवाले यांच्या बदलीनंतर  सह-अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांच्याकडे ससूनचा पदभार सोपवण्यात आला होता.  पण डॉक्टर तांबे हे स्वतःच आजारी असल्याचं सांगण्यात आल्यानंतर ससूनचा कार्यभार ससूनच्या अस्थिरोग विभागाचे प्रमुख डाॅ. श्रीनिवास शिंत्रे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.


पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळपर्यंत 427 रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी 43 रुग्णांचा या आजाराचा सामना करत असताना मृत्यू झाला. त्यामुळे पुण्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक म्हणजे 10.07 टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.