'समोरच घर असूनही लेकीला भेटता येत नाही', कोरोना योद्ध्याची कहाणी

अवघ्या पाचशे मीटर अंतरावर घर. पण ना घरी जाता येते, ना आपल्या लाडक्या लेकीला डोळे भरून बघता येतं..



मुंबई (प्रतिनिधी) : अवघ्या पाचशे मीटर अंतरावर घर. पण ना घरी जाता येते, ना आपल्या लाडक्या लेकीला डोळे भरून बघता येतं.. ही परिस्थिती आहे शरद उघडे यांची. शरद उघडे हे जी दक्षिण वॉर्डाचे वॉर्ड ऑफिसर आहेत. जी दक्षिण म्हणजे मुंबईत कोरोनाचा असा हॉटस्पॉट की सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण याच वॉर्डात थोडेथोडके नाही तर 267.


उघडे यांची टीम दिवस-रात्र इथे काम करत आहे आणि आपल्या टीमचं मनोधैर्य वाढावं म्हणून त्यांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला नाही. अत्रिया मॉलच्या बाजूला त्यांचे घर आणि तिथूनच 500 मीटर अंतरावर असलेल्या हिल टॉप हॉटेलमध्ये ते राहतात . 21 मार्चला पहिला रुग्ण जी दक्षिणमध्ये सापडला आणि 23 मार्चपासून शरद उघडे यांनी आपलं घर सोडलं आहे.


जवळपास बाराशे ते पंधराशे लोकांची टीम कोळीवाडा, जिजामाता नगर, एलफिस्टन या भागात सेवा देते आहे. अशात आपण जर घरी गेलो तर आपल्या टीमचे खच्चीकरण होऊ नये म्हणून ते घरी जात नाही.  कारण, असे अनेक जण आहेत जे ठाणे सारख्या शहरात जवळच राहतात. पण, सव्वा महिना झाला ते इथेच आहे.


उघडे यांचे आई-बाबा दोघेही सीनियर सिटीजन आहेत. त्यांच्या बाबांचं वय आहे 75 तर आईचं वय आहे 64 आणि मुलगी अवघ्या आठ वर्षांची आहे. आपण जर घरी गेलो तर काय होईल? घरात गेल्यावर आई-बाबांना लागण तर होणार नाही, ही भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळेच आपल्या घराच्या दारावरून या काळात ते शंभरदा गेले असतील पण घराचा दरवाजा टकटक करून आत जाताही आले नाही.


हे सगळं कधी एकदा संपते आणि  आपण घरी जातोय असं, उघडे यांना झालं आहे.  ही परिस्थिती खरंतर थोड्याबहुत फरकाने सगळ्याचं सहाय्यक आयुक्त किंवा वॉर्ड ऑफिसरची आहे.  ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. प्रत्येक वॉर्ड ऑफिसरच्या सोबत इंजिनियर आणि त्यांच्या खालोखाल काम करणारे कर्मचारी आहेत. पण कोरोनाच्या या संसर्गाच्या कठीण काळातही  आपल्या जीवाची, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता यात काम करतात. देशसेवा म्हणजे दुसरं काय हो!