तुम्हालाही कोरोनाव्हायरसशी संबंधित स्वप्नं (coronavirus dream) पडतात का? मग तुम्ही एकटे नाहीत. अशीच परिस्थिती अनेकांची आहे.
मुंबई (प्रतिनिधी): कोरोनाव्हायरसमुळे (coronavirus) लॉकडाऊन आहे. दिवसभर घरात असल्याने लोकांची रात्रीची झोप अशीही उडाली आहे. भरपूर प्रयत्नांनंतर झोप लागलीच तर आता स्वप्नातही (dream) हा कोरोना येऊ लागला. तुम्हालाही कोरोनाव्हायरसशी संबंधित स्वप्नं पडतात का? मग तुम्ही एकटे नाहीत. अशीच परिस्थिती अनेकांची आहे. सोशल मीडियावर बहुतेक लोकं आपला हा अनुभव शेअर करत आहेत. अशा स्वप्नांमागे नेमकं कारण असू शकताय, याबाबत सीएनएनने काही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं
येल स्कूल ऑफ मेडिसीनमधील स्लीप मेडिसीन तज्ज्ञ डॉ. मेयर क्राइगर म्हणाले, "ही महासाथीची घटना अशी आहे, जी आधी कोणी कधी अनुभवली नाही. अशी स्वप्न तेव्हा पडतात, लोकं झोपतात मात्र त्यांचा मेंदू जागा असतो."
नॉर्थम्ब्रिया युनिव्हर्सिटीतील मनोविज्ञानचे प्राध्यापक जासॉन इलिस म्हणाले, "अशी स्वप्नं का पडतात हे शास्त्रज्ञांना अद्याप समजलेलं नाही. मात्र याबाबत काही सिद्धांत देण्यात आलेत. एका विकासवादी सिद्धांतानुसार, वास्तविक जीवनात आव्हानात्मक किंवा धोकादायक अशा विविध परिदृश्यांचा सुरक्षित वातावरणात अनुभव घेण्यासाठी आपण स्वप्नांचा आधार घेतो."
"आपलं कुटुंब, काम, मानसिक समस्यांसह एका महासाथीच्या तणावात अशी स्वप्नं पडतात कारण स्वप्नं फक्त परिस्थितीचा सामना करण्यात मदत नाही करत तर वास्तविकताही प्रतिबिंबित करतात. अशा स्वप्नांमुळे मेंदू परिस्थिती झेलण्यासाठी सक्षम होतो", असं इलिस यांनी सांगितलं.
कोरोनाव्हायरसला स्वप्नांतून दूर ठेवण्यासाठी काय कराल?
-सकारात्मक भावना ठेवा.
-बातम्या पाहून, वाचून घाबरून जाऊ नका.
-आपल्या कुटुंबातील सदस्यांची मदत करा, त्यांना आनंदी ठेवा.
-लॉकडाऊन असला तरी स्वत:ला जास्तीत जास्त व्यस्त ठेवा. यामुळे शरीरात सकारात्मक हार्मोन्सची निर्मिती होईल. भीती आणि समस्या कमी होतील.
-व्यायाम करा, संगीत ऐका, घरातल्या घरात खेळता येतील असे खेळ खेळा.
-सर्वांपासून दूर आहात, प्रत्यक्ष भेटणं आता शक्य नाही मात्र सोशल मीडियावर त्यांच्याशी संपर्कात राहा.