शासकीय यंत्रणेचा गाफीलपणा चव्हाट्यावर, उमरग्यातून साडेचारशे नागरिक गायब

टाळेबंदीनंतर परराज्यातील अनेक नागरिक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतत होते. 28 मार्च रोजी तालुक्यातील कसगी येथे महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर तेलंगणामधील 465 नागरिक ट्रकमधून जात असताना आढळून आले.



उस्मानाबाद (प्रतिनिधी) : 'जेथे आहात तेथेच थांबा' अशा शब्दात देशाचे पंतप्रधान आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यानी स्पष्ट निर्देश दिले होते. उमरगा तालुक्यात पोलीस आणि महसूल प्रशासनाने मात्र हे निर्देश पुर्णतः डावलल्याचे पुढे आले आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा उमरगा तालुका केंद्रबिंदू असताना त्यांच्या ताब्यातील तेलंगणाचे साडे चारशे नागरिक दोन दिवसात गायब झाले आहेत. प्रशासनाला मात्र अद्यापही याचा थांगपत्ता नाही. उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांच्याशी संपर्क साधला असता अद्याप याबाबत आपणास अधिकृत माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी पोलीस उपअधीक्षक म्हणून उमरगा येथे कार्यरत आहेत.


उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारागृहात मागील 15 दिवसांपासून तेलंगणामधील 465 नागरिक वास्तव्यास आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशानुसार या निवारागृहाची जबाबदारी महसूल प्रशासनाकडे आहे. मागील तीन दिवसात या निवारागृहातून टप्प्या-टप्प्याने सर्वच जण गायब झाले आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाला अद्यापही याचा थांगपत्ता नाही. विशेष म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कोरोनाबाधित उमरगा येथेच आढळून आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचे केंद्रबिंदू असलेल्या तालुक्यातच प्रशासनाचा गाफीलपणा चव्हाट्यावर आला आहे.


टाळेबंदीनंतर परराज्यातील अनेक नागरिक मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी परतत होते. 28 मार्च रोजी तालुक्यातील कसगी येथे महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर तेलंगणामधील 465 नागरिक ट्रकमधून जात असताना आढळून आले. जिल्हा आणि राज्यबंदीचे आदेश असल्याने त्या सर्वांना उमरगा येथेच रोखून ठेवण्यात आले. राज्य शासनाच्या आदेशानुसार या सर्व 465 जणांची उमरगा प्रशासनाने औद्योगिक वसाहत येथे तात्पुरत्या निवारागृहात व्यवस्था केली. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला. त्यांच्या निवसासह दोन वेळच्या भोजनाचीही व्यवस्था केली. मात्र मागील दोन या निवारागृहातून सर्वच जण गायब झाले आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने तीन दिवसांचा पूर्ण वृत्तांत विशद केला. 12 एप्रिल रोजी 215 नागरिक निघून गेले. 13 एप्रिलला अंदाजे 20 जणांनी पळ काढला. मंगळवारी 14 एप्रिल रोजी सकाळचे भोजन उरकून उर्वरित सर्वजण गायब झाले. ज्यांच्यावर या सर्वांची जबाबदारी होती त्या महसूल प्रशासनाला मात्र अद्यापही याचा थांगपत्ता नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


अद्यापही अधिकृत माहिती नाही : उपविभागीय अधिकारी


तेलंगणा राज्यातील त्या सर्व 465 नागरिकांचा सांभाळ करण्याची जबाबदारी प्रशासनाची होती. मात्र ते थांबायलाच तयार नव्हते. ते निघून गेले असले तरी अद्याप आपणास अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. तेथे तैनात असलेल्या पोलिसांना हे कसे घडले याबाबत विचारणा केल्यानंतरच सर्वकाही स्पष्ट होईल. पोलिस बंदोबस्त असताना लोक पळून कसे गेले ? याचा लेखी अहवाल घेतला अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले यांनी दिली.