हिंदू-मुस्लीम रुग्णांसाठी कोविड-19 चे वेगवेगळे वॉर्ड; डॉ. म्हणाले, प्रशासनाच्या आदेशनंतर घेतला निर्णय

दोन्ही धर्मांच्या रुग्णांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे



नवी दिल्ली/अहमदाबाद : देशात दररोज कोरोना व्हायरसची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढत आहे. आता तर संसर्ग झालेल्यांचा आकडा 11000 पार गेला आहे. रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने रुग्णालयांवरही ताण येत आहे.


यादरम्यान गुजराजच्या (Gujrat) अहमदाबादस्थित एका रुग्णालयात कोरोना रुग्णांना धार्मिक आधारावर वेगवेगळे कोविर्ड वॉर्ड (Covid - 19) बनवण्यात आले आहे. येथील डॉक्टरांचं म्हणणं आहे की सरकारच्या निर्णयानंतर ही व्यवस्था करण्यात आली आहे.


काय आहे संपूर्ण प्रकरण


ndian Express च्या रिपोर्टनुसार हे प्रकरण अहमदाबाद येथील सिव्हील रुग्णालयातील आहे. येथे कोरोनाचे रुग्ण आणि संशयितांना धर्माच्या आधारवर बेड दिला गेला आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी 1200 खाटा पूरविण्यात आल्या आहे. रुग्णालयातील कोविड वॉर्डचं हिंदू-मुस्लीम रुग्णांमध्ये विभाजन करण्यात आलं आहे. म्हणजेच 600 खाटा हिंदू आणि 600 खाटा मुस्लीम रुग्णासांठी देण्यात आल्या आहेत.


या रुग्णालयात 186 कोरोना संशयितांना भरती करण्यात आलं आहे. आतापर्यंत यामध्ये 150 जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली आहे.


रुग्णांनी सांगितली हकीकत


एका रुग्णांने सांगितले की, रविवारी रात्री पहिल्या वॉर्डमध्ये भरती 28 रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. दुसऱ्या वॉर्डमध्ये हलविण्यामागील कारण आम्हाला सांगितलं नाही. शिफ्ट केलेले सर्व रुग्ण एकाच समुदायाचे आहेत. याबाबच ड्यूटीवर असलेल्या एका स्टाफला विचारणा केली असता त्याने दोन्ही धर्मांच्या रुग्णांच्या सुविधेसाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले.


राज्य सरकारच्या आदेशानंतर केला बदल


रुग्णालयाचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. गुणवंत राठोड यांनी सांगितले की, ‘रुग्णालयात कोविड – 19 च्या हिंदू-मुस्लीम रुग्णांना वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. राज्य सरकारच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.’


आरोग्य मंत्री म्हणाले...


डॉ. गुणवंत राठोड यांनी राज्य सरकारच्या आदेशाचे पालन करीत असल्याचे सांगितले. मात्र आरोग्य मंत्री नितिन पटेल यांनी याबाबत तपास करीत असल्याचे सांगितले. तर अहमदाबादचे कलेक्टर यांनी या प्रकरणाबाबत माहिती नसल्याचे सांगितले.