सरोगसीने जन्मलेल्या बाळाची तब्बल 17 दिवसांनी झाली भेट; पाहताच आई-बाबांचे डोळे आले भरुन

या 17 दिवसांच्या बाळाने गुजरात ते बंगळुरु असा हवाई प्रवास केला.



गुजरात : गुजरातमध्ये  सरोगसीतून जन्माला आलेल्या बाळाला हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बंगळुरुला आणण्यात आले आहे आणि तिच्या आई-वडिलांकडे सोपविण्यात आले आहे. कोरोनाच्या संकटात मुलीला आपल्या हातात घेतल्यानंतर त्या दोघांच्याही डोळ्यातून अश्रू तरळले. गेल्या अनेक दिवसांपासून ते आपल्या बाळाची वाट पाहात होते. कधी एकदा बाळ बघते असं त्या आईला वाटतं होतं. लॉकडाऊनमुळे यात असंख्य अडचणी येत होत्या. मात्र अखेर आई-बाबांनी आपल्या लेकीचा चेहरा पाहिला आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.


डॉ. पूजा नदकर्नी सिंह यांनी सांगितले की, या मुलीचा जन्म 29 मार्च रोजी सरोगसीने सूरतमधील एका रुग्णालयात झाला. त्यानंतर तब्बल 17 दिवसांनी या नवजात बाळाला त्याचे आई-वडिल बघत आहेत. कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे ते गुजरात येऊ शकत नव्हते.


त्यांनी सांगितले की, एक वर्षांपूर्वी बंगळुरुच्या दाम्पत्याने त्यांच्याकडून आयव्हीएफ आणि सरोगसीच्या माध्यमातून बाळासाठी संपर्क केला होता. 29 मार्च रोजी मुलीचा जन्म झाला. दाम्पत्य तेथे पोहोचू न शकल्याने हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून नवजात बाळाला बंगळुरुला पाठविण्यात आले. अहमदाबाद विमानताचे निर्देशक अमन सैनी यांनी सांगितले की हवाई रुग्णवाहिका दिल्लीहून येथे पोहोचली आणि यादरम्यान नवजात मुलीच्या सर्व सुरक्षेचं पालन केलं होतं.