चिंताजनक! पुण्यात आज 104 नवे रुग्ण; एका दिवसातली आजवरची सर्वात मोठी वाढ

पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या 876 वर पोहोचली आहे. दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 36 कोरोनारुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.



पुणे (प्रतिनिधी) : पुण्यात अतिरिक्त निर्बंध लागू असूनदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेच आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभरात 104 पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले. ही आजवरची एका दिवसात झालेली सर्वात मोठी वाढ आहे. दिवसभरात 4 जणांचा मृत्यूही झाला.  दिवसभरात कोरोनाचा संसर्ग झालेले 8 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


पुण्यात एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या 876 झाली आहे. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 667 रुग्णांवर उपचार झाले. 25 ससूनमध्ये तर उर्वरित रुग्णांवर खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार सुरू आहेत.  यातल्या 36 कोरोनारुग्णांची स्थिती चिंताजनक आहे.


दरम्यान पुण्यात अतिरिक्त निर्बंध लागूनही कोरोनारुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत गेले तसतसा शहराचा काही भाग सील करण्यात आला.


तरीही उर्वरित भागात पुणेकरांनी लॉकडाऊनचे निर्बंध न पाळल्याने कोरोनाबाधितांमध्ये सातत्याने वाढ होत होती. दोन दिवसांपूर्वी अनेक भागांमध्ये (Coronavirus Pune seal) त्यामुळे अतिरिक्त निर्बंध लागू करण्यात आले. 22 आणि 23 एप्रिलला पुण्याचा मध्यभाग आणि इतर बराच भाग त्यामुळे कडकडीत बंद होता. हे निर्बंध उद्यापासून थोडे शिथिल होणार आहेत, पण 20 तारखेपूर्वी होते तसे निर्बंध कायम राहणार आहेत.


पुण्याचा काही भाग 7 एप्रिल आणि 14 एप्रिलला सील (Pune areas seal) केला तिथं अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या सेवा सकाळी 10 ते 12 या दोनच तासांसाठी सुरू राहतील. मात्र 20 एप्रिल नंतर जो भाग सील (प्रतिबंधित ) केला त्या भागात ही सेवा 10 ते 2 अशी 4 तास खुली राहतील.


कुठला भाग आहे प्रतिबंधित?


समर्थ पोलीस ठाणे, कोंढवा, खडक,फरासखाना पोलीस हद्दीतील पूर्ण भाग गेले दोन दिवस अतिरिक्त निर्बंधाखाली होता.शिवाय स्वारगेट,दत्तवाडी, बंडगार्डन, खडकी, वानवडी, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही भागही रुग्णसंख्या वाढल्याने अतिरिक्त निर्बंधाखाली होता.