दारू प्यायल्यानं कोरोना पोटातच मरतो का? कार्तिकच्या प्रश्नावर काय म्हणाल्या डॉक्टर;

कार्तिक आर्यन सुरुवातीपासूनच सोशल मीडियावरुन कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करताना दिसत आहे.



मुंबई (प्रतिनिधी): सध्या देशभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. या व्हायरसमुळे अनेकांचं जगणं कठीण होऊन बसलं आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी सध्या सिनेमांचं शूटिंग थांबवून घरी बसले आहेत. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र सर्वजण चाहत्यांमध्ये कोरोना व्हायरसबाबत जनजागृती करताना दिसत आहेत. असाच एक अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन.


मागच्या बऱ्याच काळापासून कार्तिक सोशल मीडियावरुन कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसत आहे. अशात सध्या कार्तिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात त्यानं एका डॉक्टरला दारू प्यायल्यानं कोरोना व्हायरस पोटातच मरतो का असा प्रश्न विचारला आहे. हा व्हिडीओ कार्तिकच्या कोकी पुछेगा सीरिजमधील दुसऱ्या एपिसोडमधील आहे. याएपिसोडमध्ये कार्तिकनं डॉक्टर मीमांसा बुच यांच्यासोबत कोरोना व्हायरसबाबत असलेल्या अफवा आमि सत्य गोष्टींवर चर्चा केली. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.


कार्तिकनं या शोमध्ये डॉक्टर मीमांसा यांना विचारलं कोरोना व्हायरस गरम वातावरणात जास्त काळ राहत नाही हे सत्य आहे का? यावर त्या म्हणाल्या हे सत्य नाही ही केवळ अफवा आहे. यानंतर कार्तिकन दुसरा प्रश्न विचारला दारू प्यायल्यानं कोरोना पोटातच मरतो असं म्हणणं आहे याबद्दल काय सांगाल, यावर त्यांनी सांगितलं की ही सुद्धा एक अफवा आहे. याशिवाय चायनीज फुड खाल्यानं कोरोना होतो किंवा लहान मुलांना कोरोना होत नाही या सुद्धा अफवा असल्याचं या मुलाखतीत डॉक्टरांनी सांगितलं.


कोरोना व्हायरसच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य सर्वात अव्वल आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे सामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटींचंही जीवन ठप्प झालं आहे. अनेक सेलिब्रेटींच्या सिनेमांचं शूटिंग थांबवण्यात आलं आहे. तसेच काही सिनेमाच्या रिलीज डेट सुद्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.