ठाणे (सीताराम विश्वकर्मा) : ठाणे महानगरपालिका परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशिररित्या रिक्षा चालवण्याचे प्रमाण मोठे आहे. असे असतानाही आरटीओने गेल्या दहा महिन्यात केलेल्या कारवाईत दीड हजार रिक्षा दोषयुक्त असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे आरटीओच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान कारवाई केलेल्या रक्षिावाल्यांकडून ३९ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील रिक्षाचालकांचा मुजोरीपणा नवा नाही. प्रवासी भाडे नाकरणे, अव्वाच्या सव्वा भाडे आकारणे, त्यातच सहा महिन्यांत रिक्षवाल्यांच्या वर्तनामुळे तीन तरुणींनी रिक्षातून उडी मारल्याने रिक्षाचा प्रवास धोकादाखक झालेला आहे. आरटोओकडूनही रिक्षांची तपासणी होणे गरजेचे असते. पण अनेकदा ते होत नसल्याने रिक्षाचालकही एकाच परवानावर रिक्षा वापरतात. बॅचही अनेकांकडे नसतो. अशा परिस्थितीत आरटीओच्या कार्यक्षमतेबाबतही अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. अशा स्थितीत आरटीओने केलेली कारवाई फारशी समाधानकारक नाही. एप्रिल २०१४ प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ६ भरारी पथकांच्या माध्यमातुन २२ हजारांहून अधिक रिक्षांची तपासणी केली. यामध्ये १ हजार ५०६ रिक्षा बोगस आढळल्या तर १ हजार ३९० रिक्षांची प्रकरणे निकाली काढण्यात आली.
- सर्वच रिक्षावाले वाईट नाहीत. एखाद्याच्या अपराधामुळे सर्वांना आरोपीच्या नजरेने पाहू नये. - रमेश साबळे, अध्यक्ष ठाणे ते भिवंडी रिक्षा चालक-मालक युनियन
- अनेक रिक्षावाले प्रामाणिकपणे काम करतात. एक-दोन टक्के लोक वाईट आहेत. परंतू यामुळे सर्वांवर आरोप करु नयेत. -आशीष डोके, अध्यक्ष ठाणे जिल्हा मनसे वाहतूक सेना